मराठी पाऊल पडते पुढे | Marathi Means a Forward step | les Marathi Marcher vers le Futur… MMF!

महाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९

फ्रान्सच्या महाराष्ट्र मंडळाने  या वर्षी दिवाळी १६ नोव्हेम्बरला साजरी केली.मी पत्नीसह Poitiers हून  Paris ला  येऊन या समारंभास हजेरी लावली. आम्ही पोचलो तेव्हा वातावरण उत्साहाचे होते. लहान मुले इकडे तिकडे धावत होती. नटून थटून आलेल्या साडीतील तरुणी, भारतीय पोषाखातील तरुण. मंच सुशोभित केलेला. अगदी महाराष्ट्रात असल्यासारखे वाटत होते.     

priyanka devi mmfr diwali 2019
priyanka devi mmfr diwali 2019

साडेचार वाजता ( म्हणजे IST प्रमाणे चार वाजता ) कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रियांका देवी-मारुलकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व सांगितले. महाराष्ट्र मंडळ जर्मनीचे श्री रवी जठार यांनी दीप प्रज्वलन केल्यानंतर श्री शशी धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र मंडळ फ्रान्सच्या कार्याचा आढावा घेत, मंडळ लवकरच १०० सभासदांचे लक्ष्य पार पाडेल अशी आशा प्रगट केली. या प्रसंगी मंडळाच्या  दिवाळी अंकाचे, Dr रसिका (भारतीय निवास पॅरिसच्या संचालिका ) यांच्या हस्ते प्रकाशन झाले. आपल्या सभासदांमधील लेखक जागा करून  त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी  गेल्या वर्षीपासून  मंडळ आपल्या  वेबसाईटवर हा दिवाळी अंक प्रसिद्ध करीत आहे. या वर्षी त्याचे संपादन प्रियांका देवी-मारुलकर यांनी केले. त्यानंतर श्री रवी जठार आणि सौ निता जठार यांनी जर्मनीत २०२० मध्ये होणार असलेल्या युरोपियन मराठी संमेलनाची व्हीडीओ क्लिप द्वारे माहिती देऊन आपल्या सभासदांनी मोठ्या संख्येने त्यात भाग घ्यावा असे आवाहन केले. भारतीय दूतावासाच्या अधिकारी माननीय श्रिला दत्ता कुमार तसेच अधिकारी श्री. अरूलनंदु ह्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

mmfr dwali 2019 deep prajwalan
mmfr dwali 2019 deep prajwalan

आता ज्याची चातकाप्रमाणे  प्रेक्षक वाट पाहत होते तो मनोरंजनाचा भाग सुरु झाला. प्रथम संपदा सावर्डेकर यांनी नृत्यलेखन केलेले आणि छोट्या मुलींनी सादर केलेले ” गायिले गणपती जगवंदन  ” या भजनाने सर्वांची हृदये जिंकली. या मुलींची तयारी, आत्मविश्वास आणि पदलालित्य जितके वाखाणावे तितके थोडेच. त्यानंतर “बॉलीवूड – एक संगीतमय  प्रवास २०१०-१९५० ” प्रेक्षकांना मोहित करून गेला. मनीष शानबाग यांचे सादरीकरण ओघवते, माहितीपूर्ण  आणि प्रभावी होते.  सुचित्रा आणि शिल्पा या दोघींनी ” पद्मावत “आणि ” रासलीला -रामलीला ” या चित्रपटांमधील ” घुमर ” आणि “ढोल बाजे ” या गाण्यांसमवेत नृत्य सादर करून हा कार्यक्रम अतिशय उंचीवर नेऊन ठेवला. सुचिता, शाल्मली, शलाका, कुशल या इतर गुणी कलाकारांनी या कालखंडातील चित्रपटांमधील गाणी सादर केली. कादंबरी, आश्लेषा, अमेय यांनी पण सुंदर नृत्य सादर गेले. सर्व गायकांचे आवाज मधुर आणि गाण्यांवरची पक्कड मजबूत .पण नृत्य गतिशील तर गाणी स्थिर. गाण्यांची संख्या दहाच्या वर गेल्यामुळे मला तरी शेवटी कार्यक्रम रेंगाळल्यासारखा भासला. 

mmfr diwali 2019 diwali ank
mmfr diwali 2019 diwali ank

त्यानंतर आली पाळी “मंजुळा ” या एकांकिकेची. मंदार आठल्ये आणि सहकलाकारांनी अतिशय मेहनतीने बसविलेली ही  एकांकिका आजच्या मनोरंजन भागाला शिखरावर घेऊन गेली. सर्वांचा अभिनय उत्कृष्ट. पण स्मृती कुलकर्णी  हिचा विशेष उल्लेख केला तर अनुचित होणार नाही. तिने अश्विनी-मंजुळा या पात्राचे बारकावे सहजपणे आपल्या अभिनयातून दाखविले.

mmfr maharashtra mandal france diwali 2019
mmfr maharashtra mandal france diwali 2019

आता मनाचे रंजन झाले होते  पण पोटोबा भोजन मागत होते . मंडळाने तीही व्यवथा केली होती. भोजन ठीक होते. पण माझी मात्र थोडी निराशा झाली. दिवाळी म्हटले की फराळ हवाच. एखादा लाडू, एखादी कारंजी, एखादी चकली  अथवा थोडी शंकरपाळी. तसं काही नव्हते. अर्थात दिवाळीच्या निमित्ताने आपण भेटतो, गोड गोड बोलतो, एकमेकांची खुशाली विचारतो हा फराळही तितकाच खमंग आणि रुचकर. त्याची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या Poitiers गावी परतलो. महाराष्ट्र मंडळ फ्रान्सचे  मनःपूर्वक आभार.

Shashikant Bhosle

    Comments are closed

    · Copyright ©2007 - 2023 Maharashtra Mandal France All Rights Reserved ·

    Website by Creativity Please