पं. भीमसेन जोशींना फ्रान्समध्ये आदरांजली

प्रसाद जोशी, पॅरिस

 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या गायनावरील विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करून, फ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाने या थोर गायकाला आदरांजली वाहिली.
१ मे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने जसा महत्वपूर्ण दिवस आहे, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कामगार दिनामुळे जागतिक महत्वदेखील आहे. फ्रान्समध्ये हा दिवस “ल फेत द म्युंगे’ म्हणजे, “प्रेमाचा संदेश’ देणारा सण म्हणून साजरा केला जातो. फ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाने येथील “इंडिया हाऊस’च्या (भारतीय विद्यार्थ्यांचे निवासस्थान) सहकार्याने साजरा केला. केवळ मराठी भाषकांनीच नाही, तर येथील भारतीय वंशाचे नागरिक आणि स्थानिक फ्रेंच मित्रांनीही महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणे महाराष्ट्र मंडळाने नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याची प्रथा यंदाही कायम ठेवली.

कार्यक्रमाची सुरवात मंडळाचे अध्यक्ष डॉ. शशिकांत धर्माधिकारी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनतर “इंडिया हाऊस’चे प्रमुख डॉ. अध्यक्ष बिकास संन्याल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर राजगुरू यांनी पं. भीमसेन जोशी यांच्या गायन क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीची सर्व उपस्थितांना ओळख करून दिली. पंडितजींबरोबरचे अनुभव त्यांनी यावेळी कथन केले. “स्वराकृती’ ही पंडितजींच्या जीवनावरील आणि त्यांच्या गायकीची माहिती करून देणारी ध्वनिफीत ऐकवण्यात आली. पंडितजींचे चिरंजीव श्रीनिवास जोशी हे या ध्वनिफितीचे निर्माते आहेत.

महाराष्ट्र मंडळाच्या एक कार्यकर्त्या आशा राजगुरू अलिकडेच पुण्यास गेल्या होत्या. पंडितजींच्या कुटुंबीयांपुढे त्यांनी १ मे रोजी करण्यात येणा-या या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्यावेळी श्रीनिवास जोशी यांनी ही ध्वनिफीत दिली. त्यातील प्रत्येक बंदिशी ही पंडिताजींच्या आयुष्याची अगदी पुरेपूर ओळख करून देते. त्यातील विशेषत: “राखियो तुम राखियो, कहचली जोगनिया उनहिनको’ या बंदिशीने मी अक्षरश: भारावून गेलो. पंडितजींच्या पत्नी (स्व.) श्रीमती वत्सला जोशी यांचे पंडितजींच्या कार्यात बहुमोल स्थान होते त्यांच्या निधनाने पंडितजींच्या आयुष्यात फार मोठी दरी निर्माण झाली, अशा भावना या बंदिशीत व्यक्त करण्यात आल्या आहे.

पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव जयंत जोशी यांना या कार्यक्रमाबद्दल समजल्यानंतर त्यांनी मंडळाला पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, “माझे वडील पं. (कै.) भीमसेन जोशी यांना आदरांजली वाहण्यासाठी पॅरिसचे महाराष्ट्र मंडळाने कार्यक्रम आयोजित करून सहसंवेदना व्यक्त करत आहेत. आमच्या दु:खात सहभागी झाल्याबद्दल आम्हा सर्व कुटुंबीयांतर्फे मी पॅरिसच्या महाराष्ट्र मंडळाचे आभार मानतो. हा कार्यक्रम चांगलाच होईल असा मला विश्वास वाटतो.’

कार्यक्रमा दरम्यान एरिका जोशी या पॅरिसमधील विद्यार्थिनीने “टाळ बोले चिपळीला’ आणि “माझे माहेर पंढरी’ ही पंडितजींची भजने सिंथेसाझरवर सादर केली. त्यानंतर गायत्री कोडबागीने आपल्या नृत्यातून “रघुवर तुमको मेरी लाज’ हे संत तुलसीदासांचे आणि पंडितजींनी गायिलेले भजन सादर केले. उत्तरोत्तर कार्यक्रमाची शोभा वाढतच गेली. त्यानंतर पं. शिवकुमार यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी पं. भीमेसेन जोशी यांनी निर्माण केलेल्या “कलाश्री’ या रागाची झलक गाऊन दाखवली. “जो भजे हरी को सदा’ हे मूळ पंडितजींच्या आवाजातील भजन गायले. फ्रान्समधील प्रख्यात संगीतकार आणि लेखक इगल शमीर यांनी व्हायोलीनवर त्यांना साथसंगत केली.

या कार्यक्रमाचे निवेदन अनिल साठे यांनी केले. संगीताने मंत्रमुग्ध झालेल्या फ्रेंच मंडळींनी पंडितजींच्या गायकीचे कौतुक केले. खरोखरच पंडितजींकडे एक दैवी शक्ती होती, हे नक्की. कारण ज्यांची भाषा आणि शब्द वेगळे आहेत, असे लोकही या गायनाने भारावून गेले.

यंदा फ्रान्सच्या महाराष्ट्र मंडळ या संघटनेला चार वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे प्रथेप्रमाणे केक कापून मंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. गेल्या चार वर्षांचा आढावा घेतल्यास, मंडळाच्या कामगिरीचा आलेख हा चढताच राहिलेला आहे. विविध प्रकारचे नवनवीन कार्यक्रम आयोजण्यात आले आणि ते यशस्वी करण्यात हे मंडळ कायम अग्रस्थानी राहिले आहे. याचे श्रेय या मंडळात सक्रीय असलेल्या सर्व मराठमोळ्यांना जाते. पंडितजींना स्मरून मंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

Share your thoughts...