मकर संक्रांत २०१८

सालाबादप्रमाणे हे शब्द न वापरता दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाचे वर्णन करायचे असे ठरवले आणि क्षणभर विचारच थांबले. तेंव्हा जाणवले कि आपल्या परिचयाच्या शब्दांबरोबर नाळ इतकी घट्ट बसलेली असते कि त्याशिवाय दुसरी गोष्टच सुचत नाही. तर असो, नमनाला घडाभर तेल न घालता अगदी सरळ सुरवात करतो. निमित्त होते एका बहारदार कार्यक्रमाचे आणि त्याचे आयोजन महाराष्ट्र मंडळ – फ्रान्स यांनी केले होते. आता याला एक कार्यक्रम म्हणायचे का अनेक हाच प्रश्न होता कारण हा त्रिवेणी संगम होता. नेहमीच्या धुमधडाक्यात पण अतिशय शिस्तबद्धपणे कार्यक्रम सादर करणे म्हणजे महाराष्ट्र मंडळ – फ्रान्स यांची खासियत. ह्यावेळी वार्षिक सर्व साधारण सभा, Epiphany (Christian feast day for the coming and incarnation of Jesus Christ) आणि अगदी बरोबर १४ जानेवारी हा मुहूर्त साधून  मकर संक्रांत अशा तीन कार्यक्रमांचं आयोजन एकत्र साजर करण्यात आलं.

आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडतो का ते माहित नाही पण मला तरी हा प्रश्न कित्येक वर्षे पडत आला आहे कि मकर संक्रात ह्या अस्सल भारतीय सणाची तारीख १४ जानेवारी या इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे कशी येते ? तुम्ही आपल्या पंचांगा प्रमाणे बघा, तुम्हाला सर्व सण हे एखाद्या तिथीत बांधले गेलेले दिसतील आणि त्यांच्या तारखा ह्या दरवर्षी बदलत राहतात पण मकर संक्रांत म्हंटली कि १४ जानेवारी. शेवटी गुगल गुरूंना विचारून ह्या विषयाची शहानिशा करून घेतली आणि त्यांनी विखरून दिलेल्या किरणांना अनुसरून एक धागा मिळाला म्हणजे त्याचे कारण असे कि मकर संक्रात हा दिवस सूर्याच्या स्थितीप्रमाणे ठरवला जातो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थितीप्रमाणे ठरवले जातात. त्यामुळे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे १४ जानेवारी आणि आपल्या कॅलेंडर प्रमाणे मकर संक्रात हे एकाच दिवशी येतात.

कार्यक्रमाची सुरवात अर्थातच नवीन सभासदांची ओळख. नेहमीप्रमाणे ह्यावेळी सुद्धा साधारण ५ ते ६ नवीन सभासद व त्यांचे कुटुंबीय ह्यांनी आपला परिचय करून दिला. तुम्हाला वाटेल हे तर प्रत्येक ठिकाणीच असते, पण नाही. जेव्हा एखाद्या नवीन सभासदाचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा परिचय महाराष्ट्र मंडळ फ्रान्स यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये होतो तेंव्हा ती गोष्टच वेगळी असते. कारण नवीन सभासदाची नुसती औपचारिक ओळख करून घेतली जात नाही तर त्यावर अनेक सभासद आपल्या स्वतःच्या प्रतिक्रिया देतात जसे कि ‘अरे हे तर आमच्याच कंपनी मध्ये आहेत आणि आमची ओळख इकडे होतेय’ किंवा ‘बरं झालं इकडेच भेटलात मला तुमच्या कस्टमर कडे काम होते’ वगैरे वगैरे. अशा ओळखीमुळे नवीन सभासदाला इथलं वातावरण अत्यंत अनौपचारिक वाटायला लागतं आणि आणि त्यांचे कुटुंबीय इतके समरसून जातात कि त्यांना अगदी घरच्या कार्याला आलो आहे असे वाटते.

ह्यावेळच्या ओळखी मध्ये अजून एक जाणवलेलं वेगळेपण म्हणजे ‘श्री भाटिया’ आणि ‘श्री अय्यर’  ह्या आडनावाच्या पण संपूर्णपणे ‘मराठी’ असलेल्या कुटुंबांनी महाराष्ट्र मंडळ फ्रान्स मध्ये प्रवेश घेतला. ह्या दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या अस्खलित मराठीत करून दिलेल्या परिचयाने आपली ‘मराठी’ शी किती घट्ट वीण आहे हे दाखवत सर्व सभासदांना थक्क करून सोडले. ही ओळख परेड संपली आणि सर्व सभासद विखुरले आणि एकमेकांशी ओळख करण्यात तसेच नवी माहिती गोळा करण्यात रंगून गेले. थोड्याच वेळात हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटप सुरु झाले आणि ह्या प्रसंगात सुद्धा सगळे जण अगदी हिरीरीने भाग घेत होते. काही वेळ असाच गेला आणि सगळ्यात मोठया कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ती म्हणजे खाण्याचा. खाद्यपदार्थांची जणू खैरात होती.  सामोसे, भजी, चटण्या हे अगदी अस्सल भारतीय पदार्थ आणि ‘LA galette des Rois with its crown’ असे अस्सल फ्रेंच पदार्थ. जणू दोन्ही खाद्यसंस्कृतीचा सुंदर मिलाफ होता. आणि त्यावर कडी म्हणजे फळांचे ज्यूस आणि विशेष शीत पेये जी नुसतीच शीत नव्हती तर जरा वेगळीहि होती. एकंदर म्हणजे अगदी मेजवानी होती आणि सर्वानी ह्या पदार्थाना अर्थातच अगदी मनापासून दाद दिली.

ह्या कार्यक्रमा आधी एक महत्वपूर्ण सभा आयोजित केली गेली होती आणि ती म्हणजे कार्यकारिणीची वार्षिक सवसाधारण सभा. आणि विशेष म्हणजे नवीन कार्यकारी मंडळाने आजपासूनच पदभार स्वीकारला होता त्यामुळे नवीन कार्यकारी मंडळाच्या सभासदांच्या कानपिचक्या घेणं चालू होतं आणि अक्षरशः हशा वर हशा पिकत होता. संपूर्ण कार्यक्रमात कमालीची शिस्तबद्धता आणि आटोपशीरपणा होता पण त्यामुळे कुठेही आरडाओरडी नव्हती कि कोणाचे दडपण. सगळे अगदी मनापासून आनंद घेत होते आणि अगदी न सांगता मदतदेखील करत होते. जुन्या कार्यकारीमंडळाने त्यांच्या महाराष्ट्र मंडळ फ्रान्स स्थापन कार्यातील अनेक प्रसंगाचे वर्णन अतिशय मार्मिकपणे केले आणि नवीन कार्यकारी मंडळाला शुभेच्या दिल्या पण त्याचबरोबर त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

अशाप्रकारे प्रत्येक सभासदाच्या अपेक्षा उंचावत आणि ह्यापुढे येऊ घातलेल्या विविध कार्यक्रमांची उत्कंठा वाढवत एका दिमाखदार कार्यक्रमाची सफल पूर्वक सांगता झाली ती म्हणजे महाराष्ट्र मंडळ फ्रान्स आयोजित – मकर संक्रांत २०१८.

3 thoughts on “मकर संक्रांत २०१८”

 1. मकर संक्रांतीनिमित्त झालेल्या या त्रिवेणी संगमी कार्यक्रमाचा हा वृत्तांत वाचून आणि फोटो पाहून त्यात सामील झाल्यासारखे वाटले.. लेखकाचे नाव दिलेले नाही. कृपया त्यांना माझे अभिनंदन जरूर कळवावे.
  नव्या कार्यकारी मंडळाच्या सर्व सभासदांना माझ्या शुभेच्च्छा
  वार्षिक सर्वसाधारण सभेत जे निर्णय घेतले जातात त्याची माहिती सर्व सभासदांना मेल द्वारे दिली गेली तर बरे होईल असे मला वाटते . जरूर विचार करावा .

  शशिकांत भोसले
  Poitiers

  Reply
 2. फारच छान लेख. आख्खा समारंभ डोळ्यासमोर उभा राहिला. फक्त लेखकाचे नाव अपेक्षित होते.

  Reply
 3. धन्यवाद. लेखक आमचे सभासद श्री. सचिन गोडबोले आहेत.

  Reply

Share your thoughts...