महाराष्ट्र मंडळ फ्रांसची दिवाळी
भारतीय सणांमध्ये दिवाळी सर्वात मोठा आनंददायी असा सण आहे. सालाबादप्रमाणे महाराष्ट्र मंडळ फ्रांसने आपली अकरावी दिवाळी पॅरिस येथे उत्साहात साजरी केली. मंडळाची वाढती सदस्यसंख्या आणि नवनवीन कलाकारांचा उत्साह हि नेहमीच मंडळासाठी आनंदाची बाब असते. या वर्षी देखील दिवाळीचा कार्यक्रम विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी गच्च भरलेला होता. हिंदी-मराठी गाणी, नाच, बालनाट्य, एकपात्री प्रयोग असे विविध कार्यक्रम छोट्यामोठ्यांनी सादर केले. या वर्षीचे कार्यक्रम विविध संकल्पनांवर आधारित होते. मंडळातील लहान मुलांनी दिवाळी निमित्त प्रकाशाचे आणि आशेचे महत्व सांगणारे “guiding light” नाटुकले सादर केले. तसेच काही सभासदांनी दिवाळी निमित्त जुनी मराठी आणि हिंदी गाणी तसेच नाच सादर केले.

 

या दिवाळीत महाराष्ट्र मंडळातर्फे प्रथमच दिवाळी अंक प्रदर्शित करण्यात आला. फ्रांस मध्ये राहणाऱ्या अनेक सभासदांनी उत्साहाने प्रथम अंकासाठी लेख पाठवले. आनंदाची गोष्ट म्हणजे भाषेची अट नसताना देखील सर्व लेख आवर्जून मराठीतच लिहिले आहेत. मंडळाच्या संस्थळावर हा अंक येत्या काही दिवसात प्रदर्शित केला जाईल.

 

महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्र मंडळ देखील पुलंचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त पु. ल. लिखित “मी आणि माझा शत्रुपक्ष” यातील काही संपादित भाग सादर करण्यात आला. तसेच “ती फुलराणी” या नाटकातील देखील काही भाग सादर करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अमोल केळकर यांनी पुलंच्या जन्मशताब्दी निमित्त पुण्यभूषण फाउंडेशन आणि आशय फिल्म क्लब यांच्या सौजन्याने होत असलेल्या ‘ग्लोबल पुलोत्सव’ मध्ये मंडळ सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शन आणि बक्षीस समारंभाने झाली. स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा गोड समारोप झाला.

 

-प्रियांका देवी-मारुलकर, पॅरिस

 

Share your thoughts...