११ वा वर्धापनदीन सोहळा

११ वा वर्धापनदीन सोहळा

आपल्याकडे ११ या संख्येला खूप महत्व आहे. अगदी जप करण्यापासून ते उपास, देणगी अथवा दक्षिणा किंवा अगदी आहेर करतानासुद्धा या ११ संख्येच्या पटीत आपण करतो. यामागचा नक्की उद्देश काय असावा याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तेंव्हा बऱ्याच गोष्टी नजरेसमोर आल्या. ११ हि संख्या दोनदा १ या संख्येने बनली आहे. १ याचा अर्थ नवीन सुरवात आणि शुद्धता आणि ज्यावेळी या संख्येला पुन्हा १ ने जोडले जाते तेंव्हा त्याची तीव्रता दुप्पट होते. याचा दुसरा अर्थ हा समानता असा होतो. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही सामान आहेत म्हणजे सूर्यशक्ती आणि चंद्रशक्ती यांचा सुंदर मिलाफ होतो आणि समतोल साधला जातो. खरंच आपल्या पूर्वजांची विचारशक्ती किती थोर होती हे जाणवते आणि ज्यापद्धतीने या संख्येला जनमानसात रुजवले यावरून त्यांच्या कल्पनाचातुर्याची प्रचिती येते. तर हे सगळे सांगण्याचं कारण म्हणजे ५ मे २०१८ रोजी सादर झालेला महाराष्ट्र मंडळ फ्रान्स यांचा ११ वा वर्धापनदीन सोहळा. ज्यामध्ये दशकपूर्तीनंतर नवीन जोशात केलेली सुरवात आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करण्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी केलेले अथक परिश्रम आहेत. दरवर्षी काहीतरी वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करणे म्हणजे महाराष्ट्र मंडळ फ्रान्स यांचं खास वैशिष्ट्य. वरून दिसायला सोपं पण करायला अत्यंत अवघड असे काम कार्यकारी मंडळ कसे काय पार पाडत याचं कायम अप्रूप वाटतं.

ह्यावेळी सादर केलेल्या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे फ्रेंच जादूगार जिमी याने सादर केलेले जादूचे प्रयोग, महाराष्ट्र मंडळ फ्रान्स यांच्या काही सभासदांनी भारतात परतल्यावर घेतलेली गरुड झेप पण मंडळाशी न तुटलेली नाळ आणि आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व संगीत विशारद व संगीत अलंकार या पदव्यांनी भूषवलेली वेदवती परांजपे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात सादर केली हिंदी आणि मराठी गाणी.

ह्या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांची यादी मोठी आहे पण त्यापैकी काही मान्यवर म्हणजे प्रमुख पाहुणे भारतीय राजदूतामधील श्री धीरज मुखिया यांनी त्यांचा अमूल्य वेळ खर्च करून हजेरी लावली तसेच आमंत्रित पाहुणे म्हणून डॉ. वसुंधरा आणि डॉ. पिअर सिल्वा फिलिओझात यांनी हजेरी लावली.

कार्यक्रमाची सुरुवात सर्वाना थक्क करणाऱ्या जादूच्या प्रयोगांनी झाली. फ्रान्समधील सुप्रसिद्ध जादूगार जिमी ह्यांनी लहान मुलांसकट थोऱ्यामोठ्यांना सुद्धा मंत्रमुग्ध करून सोडले. पत्त्यांच्या जादूबरोबरच अगदी मनातल्या आकड्यांच्या जादूमुळे खूप धमाल आली. त्यानंतर महाराष्ट्र मंडळ फ्रान्स मधील तरुण आणि तडफदार सभासद शाल्मली घैसास व पुष्कर मोरे ह्यांनी आपापल्या क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल खास असा व्हिडिओ दाखवण्यात आला. ह्यानंतर सुरु झालेला कार्यक्रम म्हणजे वेदवती परांजपे ह्यांनी सादर केलेल्या बहारदार संगीताचा नजराणा ज्यामध्ये हिंदी व मराठी गाणी तसेच खास आग्रहास्तव सादर केलेले नाट्यगीत ह्यांचा समावेश होता. ह्या कार्यक्रमात लावणी सादर केल्यावर अशी दाद मिळाली कि अखेर वन्स मोर देऊन गाण्याचा ठेक्यावर संपदा सावर्डेकर ह्यांनी बहारदार नृत्य सादर केले. ह्या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत मोहक पद्धतीने सौ अश्विनी दस्तेनवर ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी अमोल केळकर व मृणाल गर्दे ह्यांनी आभारप्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली ती नेहमीच्या पण सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमाने आणि ती म्हणजे स्नेहभोजनाने.

सचिन गोडबोले

Share your thoughts...