भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला बुद्धिदेवता गणरायाचे घरोघरी आगमन होते आणि महाराष्ट्रात पुढील दहा दिवस उत्सवाचे वातावरण भारून राहते. घरापासून मैलोन्मैल दूर राहणाऱ्या आम्हा मराठी बांधवाना अश्यावेळी घरची प्रकर्षाने आठवण येते. हि हुरहूर थोडी कमी व्हावी आणि इथे राहून गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून महाराष्ट्र मंडळ फ्रांस दरवर्षी अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा करते. यंदाचा गणेशोत्सव विशेष होता. मंडळ अकरावे वर्ष साजरे करत आहे याचा आनंद तर होताच पण आत्तापर्यंत छोट्या प्रमाणात साजरा केलेला गणेशोत्सव वाढत्या सभासदांच्या संख्येमुळे यावेळी मोठे सभागृह घेऊन साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या आवाहनाने झाली. मंडळाचे अध्यक्ष श्री अमोल केळकर यांनी गणेशाची मूर्ती टाळ गजराच्या साथीने पूजेच्या स्थानी आणली. यानंतर श्री गणेशाची पूजा आणि आरती करण्यात आली. गणेशाची आराधना आणि स्तुतीपर श्लोक,स्तोत्र, कथा, कविता आणि गीते अशी या वेळच्या विविधगुणदर्शन कार्यक्रमाची रूपरेषा होती. मंडळातील अनेक छोट्या मित्रांनी सादरीकरणात भाग घेऊन उत्तम कार्यक्रम सादर केले. संस्कृत श्लोक, मराठी गीते, भरतनाट्यम नृत्य, इंग्लिश कथा आणि नाटिका अश्या वैविध्यपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रम गच्च भरला होता.
Ganeshotsav 2018
आर्या खिस्ती, मनाली वाकडे, आदी दास्तेनवर आणि अथर्व दास्तेनवर यांनी संस्कृत श्लोक सादर केले. मनाली वाकडे, लाविष्का शर्मा, अन्वी आणि यहावी केळकर यांनी गणराज रंगी नाचतो या सुप्रसिद्ध गाण्यावर नृत्य सादर केले. अनुग्रह आणि अवंतिका चंद्रमौळी यांनी भरत नाट्यम नृत्य सादर केले. नील गर्दे याने ‘सूर निरागस हो’ हे कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणे सादर केले. सिया शानभाग हिने ‘गणपतीबाप्पा सुट्टीवर गेले’ अशी स्मृती शानभाग लिखित इंग्रजी कथा सादर केली.
फ्रान्समधील सुप्रसिद्ध, शब्दांची कसरत करणारे, विनोदी कलाकार रेयमंड देव्होस ह्यांची छोटी नाटिका श्री शशिकांत भोसले यांनी इंग्रजी मध्ये अनुवादित केली आहे. स्मृती शानभाग यांनी या नाटिकेचे सुंदर सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाचे दहा वर्षांपासून जुने स्नेही आणि सभासद श्री शशिकांत भोसले यांचा श्री शशी धर्माधिकारी आणि सौ अशा राजगुरू यांच्या तर्फे सत्कार केला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंदार आठल्ये यांनी केले. मंडळाच्या सेक्रेटरी सौ मृणाल गर्दे यांच्या साथीने सर्व कार्यकारिणी समितीने उत्साहाने प्रत्येक छोट्या मोठ्या कामात भाग घेतला.
या वेळच्या कार्यक्रमाला शंभरहून अधिक सभासद व पाहुण्यांनी हजेरी लावली होती. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
फोटो अल्बम मध्ये जरूर पहा.
– डॉ. प्रियांका देवी -मारूलकर