MMF Diwali in Sakal

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना होऊन सात वर्षे पूर्ण झाली. स्थापनेच्या पहिल्या वर्षापासून शहरातील सर्व मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. ही प्रथा आजही अव्याहतपणे चालू आहे. दिवाळीच्या आनंदात सहभागी करून देण्यासाठी, तसेच मराठी संस्कृतीशी त्यांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने, प्रतिष्ठित फ्रेंच नागरिकांनाही या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेण्यात येते.

यंदाची दिवाळी रविवारचा (१६ ऑक्टोबर) मुहूर्त साधून साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम पॅरिसमधील इंडिया हाऊसमध्ये साजरा करण्यात आला. पॅरिसच्या महाराष्ट्र मंडळातर्फे सुरवातीपासून मकर संक्रांत, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव आणि दिवाळी या महत्त्वाच्या सणांमध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात. मराठी आणि भारताच्या अन्य भागांतील कलाकारांसह फ्रेंच कलाकारा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. विशेषतः ज्या फ्रेंच नागरिकांनी भारतीय संगीताचा अभ्यास केला आहे, अशा कलाकारांना आवर्जून त्यांचे कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. त्यांच्यातील कलाकाराला उत्तेजन देणे, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

या वर्षी दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त तरुण फ्रेंच संगीतकार गियोम बारो यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खास बासरीवादन शिकण्यासाठी गियोम यांनी २००१ मध्ये मुंबईत ठाण मांडले होते. तब्बल सहा वर्षे त्यांनी पं. हरीप्रसाद चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली बासरीवादनाचे पाठ घेतले. बासरीवादनात तरबेज असलेल्या गियोम यांनी त्यानंतर युरोपभर बासरीवादनाचे अनेक कार्यक्रम केले आणि भारतीय संगीताचे श्रेष्ठत्व पाश्चात्यांच्या मनावर ठसविले

यंदाच्या कार्यक्रमात त्यांनी शुद्ध सारंग, मुलतानी आणि सिंधु भैरवी या रागांतील काही चिजा पेश करून, श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दिवाळीच्या शुभप्रसंगी इंडिया हाऊसमधील सभागृहात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या रांगोळ्यांच्या रचनांमध्ये मेणबत्त्या पेटवून सभागृह उजळविण्यात आले होते. फटाक्यांची जागा बासरीच्या नादमाधुर्याने भरून काढली होती.

गियोम बारो यांना तबल्यावर मोहसीन खान कावा यांनी अप्रतिम साथसंगत केली. मोहसीन यांचे वय केवळ १८ वर्षांचे आहे. त्यांच्या घराण्यात पाच पिढ्यांपासून तबलावादनाची परंपरा असल्यामुळे, बालवयातच त्यांनाही दीक्षा मिळाली. हे घराणे मूळचे जयपूरचे. दरवर्षी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमासाठी त्यांना आवर्जून आमंत्रित करण्यात येते. त्यांचे थोरले बंधू शाहिद हुसेन हे उत्तम संतूरवादक आहेत. ते देखिल या कार्यक्रमासाठी हजर राहिले होते.

महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळी कार्यक्रमाला इंडिया हाऊसचे प्रमुख डॉ. विकास आणि सौ. प्रीती संन्याल, पॅरिसमधील लोकप्रिय मराठी शास्त्रीय संगीतकार पं. शिवकुमार, भारतीय चित्रपटतज्ज्ञ मार्टिन अरमांड हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. मराठी रसिकांसोबत भारतीय वंशाचे नागरिक आणि स्थानिक भारतप्रेमी फ्रेंच नागरिकांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग होता. या सर्वांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल मंडळाची स्तुती केली आणि दिवाळीच्या खास मराठी फराळाचा आस्वादही घेतला.

Share your thoughts...